कोल्हापूर : सैन्यात नोकरी लावतो म्हणून पाच तरुणांची एकूण २१ लाख ५० हजारांची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रोहित मारुती मुळीक (वय २७, रा. भादवण, ता. आजरा) याला रविवारी सायंकाळी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील हनुमान नगरात राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा सहकारी तानाजी कृष्णात पोवार (मुक्काम पोस्ट कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला यापूर्वीच राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तरुणांना बनावट ओळखपत्र, नियुक्तीपत्रेही देऊन तरुणांची फसवणूक केली होती.
शिवाजी भगवान फड (रा. देवकरी, ता. अहमदपूर, जि. लातूर), संग्राम बळीराम राठोड (रा. कोठग्याळवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड), नवनाथ मोकिंद मुंढे (रा. बीड), रहीम जमीरसाब पिरवाला, ख्वाजा गौसमीया शेख (दोघेही रा. उदगीर, जि. लातूर) यांनी फसवणुकीची तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे मित्राच्या ओळखीने तानाजी पोवारला कोल्हापुरात भेटले. त्याने, रोहित मुळीक याच्या मदतीने सैन्यात नोकरीचे नियुक्तीपत्र देतो, असे सांगून प्रत्येकाकडून पैसे घेतले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर संग्राम, शिवाजी व नवनाथ हे आर्मी कॅम्प (झांशी) येथे पोहोचले. तेथे कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पमध्ये त्यांच्याकडून कचरा काढणे, रंगरंगोटीची कामे करून घेतली. त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिघांनी कोल्हापुरात येऊन राजारामपुरी पोलिसात दि. २८ डिसेंबर २०२० रोजी तक्रार दिली, त्यानुसार पोवार याला अटक केली. रविवारी मुख्य सूत्रधार रोहित मुळीक याला अटक केली.
दरम्यान, त्याने आणखी काही तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता असल्याने फसलेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन राजारामपुरी पोलिसांनी केले आहे.
अन् खिडकीतून पळाला...
मुख्य सूत्रधार रोहित मुळीक हा कोल्हापूरसह गडहिंग्लज, मुंबई, पुणे भागात वारंवार स्थलांतर होत होता. राजारामपुरी पोलीस त्याच्या मागावर होते. मुंबईतील कल्याणमधील चिंचपाडा येथे तो वास्तव्यास असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली, त्यानुसार पथक तेथे पोहोचले. पोलिसांचा सुगावा लागताच तो खिडकीतून उडी मारून पसार झाला होता. त्यानंतर तो चार दिवस कोल्हापुरात शिरोली औद्योगिक वसाहतीत आल्याची माहिती मिळाल्याने सहा. पो. नि. समाधान घुगे, कॉ. विशाल खराडे, सत्यजित सावंत, सुरेश काळे यांनी त्याला तेथे सापळा रचून अटक केली.
२१ लाख चैनीवर उधळले
अटकेतील मुळीक याने तीन महिन्यात फसवणूक केलेली सुमारे २१ लाख ५० हजाराची रक्कम ही मुंबईत चैनी करण्यावर उधळली असल्याची माहिती पुढे आली. कोल्हापुरात शनिवारी त्याने आपल्या मित्राकडून खर्चासाठी तीनशे रुपये गूगल पेवरून खात्यावर मागवून घेतल्याचेही त्याच्या मित्रांनी सांगितले.
फोटो नं. ०४०४२०२१-कोल-रोहित मुळीक (आरोपी)
===Photopath===
040421\04kol_1_04042021_5.jpg
===Caption===
फोटो नं. ०४०४२०२१-कोल-रोहीत मुळीक (आरोपी)