गगनबावडा : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात गळितास येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन २९०० रुपये देणार असून, हंगाम समाप्तीनंतर ५० रुपयांचा दुसरा हप्ताही देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, चालू गळीत हंगामाची एफ.आर.पी. प्रती मे. टन ३४७९.८५ रुपये असून, त्यातून ऊस तोडणी-वाहतूक खर्च ६५७.८३ रुपये वजा जाता कारखान्याची निव्वळ एफ. आर. पी. प्रतिटन २८२२ रुपये इतकी होत आहे. परंतु कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास एफ.आर.पी.पेक्षा १२८ रुपये जादा उचल देऊन प्रतिटन २९५० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिल्या उचलीपोटी एकरकमी २९०० रुपये देणार असून, हंगाम समाप्तीनंतर ५० रुपयांचा दुसरा हप्ता आदा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसापोटी जास्तीत जास्त दर देता यावा याकरिता कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे.
चालू गळीत हंगामात १५ नोव्हेंबरअखेर गाळप केलेल्या ७६ हजार २१३ मे. टनांची पहिली उचल २९०० रुपयांप्रमाणे २२ कोटी १० लाख १८ हजार रुपये गुरुवारी (दि. ३) संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित शाखेशी संपर्क साधावा.
कारखान्याने चालू गळीत हंगामात ३० नोव्हेंबरअखेर एक लाख ३१ हजार ५३० मे. टन उसाचे गाळप करून एक लाख ३५ हजार ६५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. कारखान्याने ठरविलेले ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.