सावरवाडी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ग्रामीण जनता भीतीच्या छायेखाली आहे. संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करून विविध निर्बंध लावले आहे. असे असले तरी नियमांचे कडक पालन होत नाही. संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी ही लोकांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात दूध संस्थेच्या दूध संकलन केंद्रांमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.
सहकारी दूध संस्थेचे पदाधिकारी यांचे शासकीय नियमाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. दूध संकलन केंद्रामध्ये गतवर्षीपेक्षा या वर्षी दूध संकलनाच्या कामकाजामध्ये नियोजनाचा अभाव आढळून येत आहे. दूध संकलन रांगेत ही सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली होत असते. प्रत्येक गावांमध्ये किमान तीन चार दूध संस्था असून सकाळी सहा व संध्याकाळी पाच वाजता दूध संकलन केले जाते . तेथे कोरोना काळात देखील बेशिस्तपणा आढळून येत आहे. सरासरी १०० ते २०० लोकांची सकाळी, संध्याकाळी ये-जा असते. यात लहान मुले , वयोवृद्ध यांचा समावेश असतो. दूध संस्थांकडून ना मास्क घालण्याची सक्ती , ना सॅनिटायझरचा वापर ,सामाजिक अंतराचे नियम लावले जात नाही. सकाळी व संध्याकाळी दूध संस्थेच्या दूध संकलनासाठी गर्दी उडत असते . सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला असतो . दूध संस्थेच्या संकलन वेळी कर्मचाऱ्याकडून शिस्त लावली जात नाही .
०८ सावरवाडी डेअरी
फोटो ओळ = ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे . करवीर तालुक्यात सहकारी दूध संस्थेच्या दूध संकलन केंद्रावर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे . दूध संस्थांकडून शासकीय नियमाचे कडक पालन करणे गरजेचे आहे . .