पोलिओग्रस्त पायाचे हाड फ्रॅक्चर
कसबा बावडा : वयाच्या पहिल्याच वर्षी पोलिओने डाव्या पायाला आलेले अपंगत्व, त्यात भर म्हणून सहा वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात याच पायाच्या हाडाला झालेले मोठे फ्रॅक्चर यामुळे फळे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर आभाळच कोसळले. अन्य रुग्णालयामध्ये या पायावर दोन शस्त्रक्रियाही झाल्या. मात्र महिनाभरापूर्वी पुन्हा झालेल्या अपघाताने ही महिला कोलमडूनच पडली. अत्यंत हताश व निराश झालेल्या या महिलेच्या पायावर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरू करून ही महिला आपल्या पायावर उभी राहू शकणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हे समाजातील सर्वासाठी मोठा आधार ठरत आहे. न्युरो, स्पाइन, ट्रामा केअर सुविधासह अनेक गुंतागुंतीच्या आजारावर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. काही दिवसांपूर्वी अस्थिरोग विभागातील डॉक्टरनी अशीच गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली. इचलकरंजी येथे फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या ३६ वर्षीय महिलेला जन्मानंतर वर्ष भरातच पोलिओ झाला. २०१४ साली झालेल्या अपघातात याच पोलिओग्रस्त पायाच्या मांडीला मोठी दुखापत झाल्याने सांगली येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र सहा महिन्यांतच पायात बसवलेली प्लेट सैल झाली. त्यामुळे २०१५ मध्ये जयसिंगपूर येथे या पायावर दुसऱ्यांदा ऑपरेशन करण्यात आले.
मात्र, या महिलेच्या दुर्दैवाचा फेरा सुरूच होता. महिन्याभरापूर्वीच ही महिला पुन्हा गाडीवरून पडली. यात दुखापतग्रस्त डाव्या पायालाच मांडीजवळ मोठे फ्रॅक्चर झाले. पूर्वीच्या दोन अनुभवांतून गेलेली ही महिला या अपघातामुळे पुरती कोलमडून गेली. मोठ्या विश्वासाने नातेवाइकांनी तिला डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अस्थिरोग विभागातील डॉक्टरांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत महिलेच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल साडेचार तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. यामध्ये पायातील दोन्ही प्लेट काढून एकच लांब प्लेट बसविण्यात आली असून, हाडामध्ये १ रॉड व डाव्या पायाचे १ हाड बसविण्यात आले. लवकरच ही महिला पूर्ण बरी होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल अस्थिरोग विभागप्रमुख डॉक्टर एस. ए. लाड व त्यांना साहाय्य करणाऱ्या पथकाचे डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डीन डॉ. आर. के. शर्मा व वैद्यकीय अधीक्षका डॉ. वैशाली गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.