इचलकरंजी : पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीपैकी पक्षप्रतोद व गटनेत्यांमध्ये बांधकाम समितीचा काही निधी अन्य विभागांकडे वर्ग करण्यावरून खडाजंगी झाली. सुमारे पाच मिनिटे सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीकडे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यासह समितीचे अन्य सदस्य अक्षरश: पाहत बसले. विरोधी शहर विकास आघाडीच्या सदस्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोसुद्धा फोल ठरला.पालिकेच्या स्थायी समितीची बैठक पालिकेच्या सभागृहात झाली. नगराध्यक्षा बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीच्या विषयपत्रिकेवर विविध खात्यांकडील पूर्ण झालेल्या विकासकामांची अंतिम देयके, न्यायालयीन प्रकरणांची बिले, वेगवेगळ्या कामांची अंदाजपत्रके, आदी विषय होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शहरातील विविध रस्त्यांवर छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. काही प्रमुख रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. परिणामी, हे खड्डे मुरमाने बुजविण्याचा आणि त्यासाठी निधी वर्ग करण्याचा विषय ऐनवेळचा विषय म्हणून घेण्यास नगराध्यक्षांनी मंजुरी दिल्याने या विषयावर बैठकीत ठिणगी पडली.बांधकाम समितीचे सभापती महेश ठोके यांनी निधी वर्ग करण्यास विरोध दर्शविला. हा विषय राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी उचलून धरला. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विरोध करू नये, असे समजाविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय कॉँग्रेसचे बाळासाहेब कलागते यांनी केला; पण माने ऐकत नसल्याने कलागते यांचाही आवाज चढला. दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून ‘शविआ’चे निमंत्रक तानाजी पोवार यांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला; पण दोघेही ऐकत नव्हते. हा विषय माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडे नेण्याचा इशारा कलागते यांनी दिला. तेव्हा आवाडे यांच्याकडे आम्ही पण येतो, असे माने यांनी सुनावले. त्यानंतर मात्र माजी आमदार अशोकराव जांभळे यांना मध्यस्थी करावी लागली.---गेल्या गुरूवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी सत्तेत असूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावत सत्तारूढ व प्रशासनास भंडावून सोडले होते. त्याच सभेत चोपडे व माधुरी चव्हाण यांनी नगराध्यक्षांच्या हुकुमांच्या कामांना विरोध दर्शविला होता, तर आता स्थायी समितीच्या सभेत राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद रवींद्र माने व राष्ट्रीय कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते यांच्यात खडाजंगी उडाल्याने पालिकेतील सत्तारूढ आघाडीतील ‘वाद’ चव्हाट्यावर आला आहे.
आघाडीतील ‘वाद’ चव्हाट्यावर
By admin | Updated: July 31, 2014 23:31 IST