कुंभोज : सुखात सारेच एकमेकांचे सोबती असतात, पण दु:खात कोणीच कोणाचे नसते, असे म्हणतात. मात्र, काही ठिकाणी अपवाद हा असतोच. सांत्वनापलीकडे आर्थिक मदतीची गरज ओळखून अपघाती मृत्यू पावलेल्या कुंभोज (ता. हातकणंगले) येथील सदाशिव जगदाळे यांचे मित्र, ग्रामपंचायत सदस्यांनी सदाशिवच्या दोन मुलांच्या नावे ५६ हजारांची ठेव ठेवून त्याच्या कुटुंबाला बळ दिले.शिवसेनेचे शहरप्रमुख तसेच जयहिंद तरुण मंडळाचे संस्थापक सदस्य असलेल्या सदाशिव जगदाळे यांचा महिनाभरापूर्वी अपघाती मृत्यू झाला. या आकस्मिक घटनेने जगदाळे कुटुंबीय गर्भगळीत झाले. या अपघातात पत्नी गीतांजली या जबर जखमी झाल्याने एकीकडे त्यांचा सुरू असलेला दवाखान्याचा खर्च, वृद्ध आई-वडील, दोन लहान मुले, जेमतेम शेती अशा स्थितीत लटपटून गेलेल्या सदाशिवच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी मित्रगण व सरपंच रूपाली पुजारी, उपसरपंच बाळासो डोणे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्येकी दोन हजाराप्रमाणे एकूण तीस हजार रुपयांची मदत मुलगा सार्थक याच्या नावे, तर सदाशिवचे मित्र किरण माळी, डॉ. सत्यजित तोरस्कर, सागर कांदेकर यांच्या पुढाकाराने २६ हजार रुपयांची मदत मुलगी साक्षी हिच्या नावे ठेव ठेवण्यात आली. याकामी ग्रा. पं.चे सदस्य कलगोंडा पाटील, जहॉँगीर हजरत, सुकुमार पाटील, अभिजित जाधव, अनिल कोरे, दीपक कोले, बाबासाहेब कोले, दशरथ पुजारी यांनी परिश्रम घेतले. जगदाळे कुटुंबीयांना मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे मुलांच्या शिक्षणासाठीची काहीशी आर्थिक विवंचना दूर होण्यास मदत झाली. ग्रामपंचायत तसेच सदाशिवच्या मित्रमंडळीप्रती जगदाळे कुटुंबीयांसह समाजाकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
सदाशिवच्या कुटुंबीयांना मित्रांचे बळ
By admin | Updated: April 2, 2016 00:02 IST