कोल्हापूर : बंगलोरहून केरळला खासगी ट्रॅव्हल्समधून प्रसिद्ध सराफाचे चार किलो सोने घेऊन जाणाऱ्या दोघा कामगारांना प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोने जबरदस्तीने लुटणाऱ्या कोल्हापुरातील चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज, मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दीड कोटीपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल यावेळी हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी सर्फराज मुझ्झफर खान (वय २८, रा. कदमवाडी), शलाल मोहंमद मकानदार (२७, रा. जुना बुधवार पेठ), जावेद ऊर्फ पप्पू हारुण शेख (३८, हुजूर गल्ली, भाऊसिंगजी रोड), रमीज रफिक चाऊस (२५, रा. बिंदू चौक) या संशयित दरोडेखोरांना अटक केली.पोलिसांनी सांगितले, बंगलोर येथून दि. ६ नोव्हेंबर रोजी जब्बार ट्रॅव्हल्सच्या बसमधून केरळ येथे चार किलो सोने घेऊन विकास कदम (रा. केरळ) या व्यापाऱ्याचे दोन कामगार निघाले होते. काही अंतरावर बस आली असता बसमधून प्रवास करणाऱ्या सहा अज्ञात तरुणांनी बस थांबवून आपण इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करून बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर त्या दोन कामगारांजवळील सोने जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी व्यापारी कदम यांनी मडीवाल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास बंगलोर येथील सेंट्रल क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक के. रामाराव करीत होते. त्यांना याप्रकरणी तपासामध्ये काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांनी काल, सोमवारी कोल्हापुरात येऊन अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची भेट घेऊन तपासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. गोयल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना तपासाचे आदेश दिले. देशमुख यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विकास देशमुख, रमेश ढाणे, विजय कोळी, संभाजी भोसले, तात्यासो कांबळे, शमू पठाण, प्रकाश पाटील, अनिल ढवळे, आदींनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, तीन किलो सोने व पोकलॅन मशीन असा सुमारे दीड कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला. दरोड्याचे प्लॅनिंग सर्व आरोपींचे कोल्हापुरात वास्तव्य असल्याने ते एकमेकांचे मित्र आहेत. बंगलोर येथील व्यापारी विकास कदम हे महाराष्ट्रीय आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी सांगली येथील दोघे तरुण कामगार म्हणून कामाला होते. कामावर असताना त्यांना बंगलोर ते केरळ अशी सोन्याची देवाणघेवाण होत असल्याची माहिती होती. त्यानुसार त्यांनी कोल्हापुरातील मित्रांच्या सहकार्याने बंगलोर येथे जाऊन दरोडा टाकण्याची योजना आखली. दरोडा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी चार किलो सोन्यामधील एक किलो सोने विकले. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी नवीन पोकलॅन खरेदी केले. उर्वरित तीन किलो सोने विकण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली.
चार दरोडेखोरांना कोल्हापुरात अटक--बंगलोरात बसवर दरोडा
By admin | Updated: November 26, 2014 00:58 IST