राम मगदूमगडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक डॉ. प्रकाश शहापूरकर हे संचालक मंडळाच्या १४ सभांना परवानगीशिवाय गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे संचालकपद रद्द झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. माजी अध्यक्षांचे संचालकपद रद्द होण्याची ही कारखान्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
२०२४ मध्ये तत्कालीन अध्यक्ष शहापूरकर यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलविण्याची मागणी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह १२ संचालकांनी केली होती; परंतु तत्पूर्वीच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
७ ऑक्टोबर २०२४ रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रकाश पताडे यांची निवड झाली. त्यानंतर अपवाद वगळता संचालक मंडळाच्या सभांना ते गैरहजर राहिले. त्यामुळे कारखान्याच्या उपविधीप्रमाणे त्यांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे. त्याबाबत कारखान्याच्या प्रशासनाकडून प्रादेशिक साखर सहसंचालकांना अवगत करण्यात आले आहे.
दरम्यान, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील सुमारे ३० कोटींच्या घोटाळाप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल आहे. परंतु, अटकपूर्व जामीन घेतल्यामुळे अटकेची कारवाई टळली होती. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतील गैरव्यवहाराची चौकशीही सुरू आहे.
पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होण्यापूर्वी आणि सहसंचालकांच्या चौकशीचा अहवाल बाहेर येण्यापूर्वीच संचालक मंडळाच्या सभांना गैरहजर राहिल्याच्या कारणावरून त्यांचे संचालकपद रद्द झाले आहे.
ठळक नोंदी
- २४ नोव्हेंबर २०२२ : शहापूरकर यांची अध्यक्षपदी निवड
- १ सप्टेंबर २०२४ : शहापूरकर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
- १३ डिसेंबर २०२४ : शहापूरकर यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा
- २७ जानेवारी २०२५ : ३० कोटींच्या घोटाळाप्रकरणी प्रादेशिक साखर संचालकांकडून चौकशीचे आदेश
- २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व डॉ. शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे कारखान्याची एकहाती सत्ता आली. त्यानंतर डॉ. शहापूरकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. तब्बल २२ वर्षांनंतर त्यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे आली होती.
- २००० मध्ये श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर आली. त्यावेळी शहापूरकर व ॲड. बाळासाहेब पाटील हे दोघेच विरोधात निवडून आले होते. मात्र, बंधपत्र न दिल्यामुळे दोघांचेही संचालकपद रद्द झाले होते.
डॉ. शहापूरकर हे संचालक मंडळाच्या १४ सभांना परवानगीशिवाय गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे कारखान्याच्या उपविधीनुसार त्यांचे संचालकपद रद्द झाले असून, त्याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकांना अवगत करण्यात आले आहे. - प्रकाश पताडे, अध्यक्ष, गडहिंग्लज साखर कारखाना