बोरवडे : बोरवडे ( ता. कागल ) येथे कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी स्वॅबची सक्ती करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारत तहसीलदार शिल्पा ठोकडे व गटविकास अधिकारी सुशील संसारे यांना घेराव घातला.
आज डोस उपलब्ध झाल्याने सकाळपासूनच ग्रामस्थांनी लस घेण्यासाठी आरोग्य उपकेंद्रावर गर्दी केली होती.सुरुवातीला काही जणांचे लसीकरण केल्यावर ग्रामसेवक सागर पार्टे यांनी स्वॅब दिलेल्या नागरिकांनाच लस देण्याची भूमिका घेतल्याने नागरिकांनी स्वॅब देण्यास नकार दिला.त्यामुळे लसीकरण थांबविण्यात आले. सुमारे चार तास गोंधळ सुरु होता.
दरम्यान, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांना गोंधळाबाबत माहिती दिल्यानंतर ते सुमारे दोन तासांनी आरोग्य उपकेंद्रावर आले. याबाबत तहसीलदार यांनी सांगितले, आपल्याला वरिष्ठ स्तरावरुन स्वॅब दिलेल्यांनाच लस देण्याचे आदेश असल्याचे सांगितले;परंतु संतप्त नागरिकांनी याबाबत लेखी आदेशाची मागणी केली असता केवळ, आपल्याला तोंडी आदेश असल्याचे सांगत तहसीलदारांनी झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
फोटो ओळी - बोरवडे (ता.कागल) येथे लसीकरणावेळी ग्रामस्थांना स्वॅबची सक्ती केल्याने तहसीलदारांना जाब विचारताना संतप्त नागरिक.