कोल्हापूर : दूषित पाणी व अस्वच्छता व बदलत्या हवामानामुळे शहरात डासांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू ताप, चिकुनगुनिया यासारखे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरात १२ डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण आढळले. यातील पाच रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका लवकरच स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे. डेंग्यूसह इतर आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पाऊस थांबल्याने हवेत वाढलेला उष्मा हा डेंग्यूचे विषाणू पसरविणाऱ्या डासांसाठी पोषक ठरत आहे. शिवाजी पेठ, नागाळा पार्क, जवाहरनगर, स्वामी समर्थनगर, सदर बझार या भागात गेल्या महिन्यापासून डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. हिवतापाच्या रुग्णांची तपासणी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात, तर डेंग्यूची तपासणी सीपीआर रुग्णालयात करण्याची सोय आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
शहरातील ५ जणांना डेंग्युची लागण स्पष्ट
By admin | Updated: July 22, 2015 00:37 IST