कोल्हापूर : टिंबर मार्केटमधील गंजीमाळ येथे घरावर तलवार हल्ला करून परिसरातील वाहनांची मोडतोड केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री आणखी पाच संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. शंकर सुभाष लोंढे (वय २२, रा. सरनाईक कॉलनी), राजेश आप्पा कांबळे (२२), साहील अस्लम हकिम (१९), सौरभ ऊर्फ स्वरूप राजू चौगले (१९) आणि महेश राजू पाथरकर (३३ सर्व रा. गंजीमाळ परिसर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्याच्याकडून चार वाहनेही जप्त केली.
पोलिसांनी दिलेली माहिती, गंजीमाळ परिसरात पूर्ववैमनस्यातून शनिवारी (दि. १०) दोन गटांत वाद झाला. त्यात एका पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याच वादाचे पडसाद सोमवारी उमटले. सुमारे २० ते २५ जणांच्या हल्लेखोरांनी गंजीमाळ परिसरातील ओंकार जाधव याच्या घराची व परिसरातील वाहनांची तोडफोड केली. या हल्लाप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला. यापूर्वी पोलिसांनी आठ संशयितांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी या प्रकरणातील संबंधित पाच संशयितांना अटक केली.