गांधीनगर : येथील टेरेसवरील दरवाजा उघडा असल्याचा फायदा उठवित गांधीनगरमधील दीपक इंदरलाल ठाकूर (रा.ब.न. १६८/७, परिवार गल्ली) यांच्या घरातील सुमारे पाच लाख रुपयांचे एकूण २२ तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. त्यामुळे गांधीनगरसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ठाकूर यांच्या घरात चोरी करण्यापूर्वी चोरट्याने नजीकच्या गल्लीतील घरात चोरीचा प्रयत्न केला. पण, त्या घरातील मुलगी जागी होऊन तिने आरडाओरडा केल्याने चोरटा टेरेसवरून पळत सुटला. याबाबत त्यांनी पोलिसांना कळविले. पोलीस त्या गल्लीत पाहणी करू लागले; पण चोरटा सापडला नाही. दरम्यान, पोलीस या गल्लीत तपास करीत होते, तर नजीकच्या दुसऱ्या गल्लीतील दीपक ठाकूर यांच्या घरात टेरेसचा दरवाजा उघडा असल्याने चोर आत शिरला. सोमवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरट्याने तिजोरीची चावी शोधून २२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. पोलीस मात्र चोरट्याचा तपास करत त्याच गल्लीत घुटमळत राहिले. ठाकूर यांच्या घरी पंधराजण असूनही ही चोरी झाली. हा प्रकार सकाळी आठ वाजता ठाकूर कुटुंबीयांच्या लक्षात आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वानपथकही मागविले; पण रात्री उशिरापर्यंत याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
गांधीनगर येथे पाच लाखांची घरफोडी; शेजारीही प्रयत्न
By admin | Updated: August 18, 2015 01:08 IST