क्रॉस व्होटिंगचा फटका : गडहिंग्लज, आजरा व चंदगडचे सर्व उमेदवार पराभूत
राम मगदूम / गडहिंग्लज
महिला राखीव गटातून लढून देदीप्यमान विजय मिळवलेल्या विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर वगळता सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतून लढलेले गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील सर्वच उमेदवारांचा 'क्रॉस व्होटिंग'मुळे पराभव झाला. त्यामुळे 'गोकुळ'च्या नव्या सभागृहात गडहिंग्लज विभागाची पाटी यावेळी पहिल्यांदाच कोरी राहिली. म्हणून गडहिंग्लज विभागातील नेतेमंडळींसह ८५२ दूध संस्थांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
'गोकुळ'चे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सत्तारूढ आघाडीतर्फे सलग सातव्यांदा निवडणूक लढवली; परंतु विरोधी लाटेत त्यांनाही प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले.
'चंदगड'मधून विद्यमान संचालक आमदार राजेश पाटील यांनी स्वतः बाजूला थांबून पत्नी सुष्मिता यांना महिला गटातून विरोधी आघाडीतर्फे
रिंगणात उतरवले होते; परंतु 'सासर-माहेर'ची पुण्याई त्यांच्या कामी येऊ शकली नाही. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान संचालक दीपक पाटील हे सत्ताधारी आघाडीतर्फे तिसऱ्यांदा लढले; परंतु विरोधी आघाडीच्या लाटेत तेदेखील वाहून गेले. त्यामुळे तीन दशकांनंतर 'चंदगड'ची पाटी यावेळी पहिल्यांदाच कोरी राहिली.
गडहिंग्लजमध्ये सत्ताधारी आघाडीने 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष दिवंगत राजकुमार हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद आणि गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांना, तर विरोधी आघाडीने सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे निष्ठावंत सहकारी महाबळेश्वर चौगुले आणि पालकमंत्री सतेज पाटील यांचे तरुण सहकारी विद्याधर गुरबे यांना संधी दिली; परंतु 'गोकुळ'च्या ऐतिहासिक सत्तांतरात त्याचे सोने झाले नाही.
---------
चौकट
१९८२ ची पुनरावृत्ती झाली..!
१९८२ मध्ये तत्कालीन सत्तारूढ आघाडीतून बाळासाहेब पाटील-औरनाळकर यांच्या रूपाने गडहिंग्लज विभागाला एकमेव उमेदवारी अन् संचालक पद मिळाले होते. त्यामुळे तिन्ही तालुक्यांचे प्रतिनिधित्व तेच करायचे. त्यानंतर यावेळी दोन्ही आघाडीतर्फे मिळून ८ जणांना उमेदवारी मिळाली होती; परंतु अंजनाताई रेडेकर वगळता सर्वांचाच पराभव झाला. त्यामुळे यावेळी तिन्ही तालुक्यांच्या पालकत्वाची जबाबदारी अंजनाताईंवरच आली आहे.
----------
सतीश पाटील यांना वगळल्याचा तोटा..!
'इलेक्टिव्ह मेरिट'चा उमेदवार म्हणून सतीश पाटील यांच्या उमेदवारीसाठी मंत्री मुश्रीफ आग्रही होते; परंतु आमदार राजेश पाटील व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी महाबळेश्वर चौगुले यांच्यासाठी अखेरपर्यंत ताणून धरले. म्हणूनच सतीश पाटील यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळेच 'गडहिंग्लज विभागा'वर ही वेळ आल्याची चर्चा आहे.