कोल्हापूर : राजस्थानमधून प्रदीर्घ काळ प्रवास करून येेथे आलेला दुतोंड्या म्हणून ओळखला जाणारा बिनविषारी मांडूळ साप (रेड सँड बोआ) कोल्हापुरात आढळला असून कोल्हापुरातील वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पमित्र अक्षय कांबळे आणि अमोल बुड्ढे यांनी या दुर्मीळ सापाला जीवदान दिले आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे सर्रास आढळणाऱ्या काळ्या रंगाचा हा मांडूळ नसून त्याचा रंग लाल आहे.
राजस्थान येथून बांगड्यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक ट्रकमधून हा मांडूळ साप कोल्हापुरात आला. १७ ऑगस्ट २०२१ रोजी येथील घिसाड गल्लीतील एका व्यक्तीला हा साप ट्रकमध्ये बांगड्या ठेवण्यासाठी लागणाऱ्या गवतात आढळला. वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पमित्र अक्षय कांबळे आणि अमोल बुड्ढे यांना याची माहिती मिळताच त्यांनी तो १८ ऑगस्ट रोजी वन विभागाच्या ताब्यात दिला. संरक्षित वर्गात मोडणारा हा साप लालसर तपकिरी रंगाचा असून, आपल्याकडे सहसा हा आढळत नाही. सर्वसाधारणपणे मांडूळ काळ्या रंगाचे असतात.
वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांच्या निरीक्षणाखाली त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याची प्रकृती चांगली आहे. लवकरच या सापाला राधानगरी, दाजीपूरसारख्या घनदाट जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
दुतोेंड्या मांडूळ (रेड सँड बोआ)
निशाचर आणि लाजाळू प्रवृत्तीच्या या सापाचा अधिवास भारतामध्ये कोरड्या आणि वालुकामय प्रदेशांमध्ये असतो. रेड सँड बोआ हे इंग्रजी नाव असून, त्याचे शास्त्रीय नाव Iryx Johnil असे आहे. त्याला मराठीमध्ये दुतोंड्या असे म्हणतात. या सापाचे मुख्य अन्न उंदीर आणि कुरतडणारे इतर कीटक आहेत. शेपूट तसेच तोंडाकडील निमूळत्या टोकांमुळे याला दुतोंडी साप म्हणतात, पण प्रत्यक्षात याला एकाच बाजूने तोंड असते. या सापाचे वजन अर्धा किलो असून, हा सव्वा फूट लांबीचा आहे, तसेच लालसर तपकिरी रंगाचा आहे. काळ्या जादूसाठी मांडुळाची तस्करी केली जाते.
----------------
फोटो : 19082021-kol-Mandul sap/19082021-kol-Mandul sap1
फोटो ओळ : कोल्हापुरात आढळलेला दुतोंडी मांडूळ साप.
190821\19kol_1_19082021_5.jpg~190821\19kol_2_19082021_5.jpg
फोटो : 19082021-kol-Mandul sap/19082021-kol-Mandul sap1फोटो ओळ : कोल्हापूरात आढळलेला दुतोंडी मांडूळ साप.~फोटो : 19082021-kol-Mandul sap/19082021-kol-Mandul sap1फोटो ओळ : कोल्हापूरात आढळलेला दुतोंडी मांडूळ साप.