कोल्हापूर : मुस्लीम धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील एक महिन्याच्या रोजांना (उपवास) उद्या बुधवार (दि. १४)पासून सुरुवात होत आहे. चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने तराबीहची नमाज पठण आज मंगळवारी होणार आहे. हिलाल चाँद समितीच्या मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लीम बोर्डिंगमध्ये झालेल्या मगरीजमध्ये हा निर्णय झाला.
बैठकीस इरफान कासमी, नाझिम पठाण, मुबीन बागवान, अबू तालिब, ताहीर बागवान, अब्दुल रऊफ, आमीन अंथणीकर, अब्दुल रजाक, अब्दुलसलाम कासमी, वाहिद सिद्दीकी, रऊफ नाईकवाडे, राहमतुल्ला कोकणे, मोहसिन बागवान, साहिल सय्यद, अनिस अहमद सय्यद, अबू रजाक कासमी, शहाजादा पखाते, उमर अत्तार, इजाज बागवान, इम्रान सौदागर आदी मान्यवर व मुस्लीम बोर्डिंगचे पदाधिकारी उपस्थित होते.
गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोना व लॉकडाऊनचे सावट असतानाही घराघरात रोजांची तयारी सुरू झाली आहे. हा संपूर्ण महिनाभर मुस्लिमांच्या घरोघरी नमाज पठण, दानधर्म असे सुरू असते. सामुदायिक नमाज पठणही होते; पण गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे या प्रथेत बदल झाला आहे. घरातच नमाज अदा करावी, पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे आवाहन प्रशासनाने यावर्षीही केले आहे.