इचलकरंजी : चंदूर-आभार फाटा (ता. हातकणंगले) परिसरातील रुई हद्दीत असलेल्या के. टेक्स या टेक्स्टाईल कंपनीच्या कापड गोदामाला शॉर्टसर्किटने आग लागली. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले.पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली नव्हती.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आभार फाटा ते चंदूर मार्गावर रुई गावच्या हद्दीत अनिल गोयल यांच्या मालकीचा के. टेक्स या नावाने पॉवरलूम कारखाना आहे. या कारखान्याच्या वरील मजल्यावर कापडाचे गोदाम आहे. या गोदामात महागडे शर्टिंगचे तयार तागे ठेवले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे गोदामाला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने कारखान्यातील कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे समजले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दल व पोलीस कंट्रोल रुमला या घटनेची माहिती दिली. काही वेळातच इचलकरंजीसह कुरुंदवाड, जयसिंगपूर येथील नगरपालिका व चंदूर ग्रामपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. पाच तास पाण्याचा मारा करून जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत शर्टिंग कापडाचे सुमारे दोन हजार तागे जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. (वार्ताहर)पहिली वर्दी द्या...आग लागल्याची माहिती देण्यासाठी गोयल यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी ठाणे अंमलदाराने माहिती घेण्याऐवजी ‘तुम्ही वर्दी द्यायला पोलीस ठाण्यात या, नंतर पंचनाम्याचे बघूया’, असे उत्तर दिले. त्यामुळे आधी आग विझविण्यासाठी प्रयत्न करू, की पोलीस ठाण्यात वर्दी द्यायला जाऊ, अशी द्विधा मन:स्थिती गोयल यांची झाली होती. त्यांनी पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली.पंधरा तासांनंतरही पोलिसांत नोंद नाहीया आगीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी इचलकरंजीसह कुरुंदवाड, जयसिंगपूर नगरपालिकेचेही अग्निशामक दल घटनास्थळी आले. मात्र, हातकणंगले पोलीस सकाळी माहिती मिळूनही दुपारपर्यंत फिरकलेच नाहीत आणि रात्री नऊ वाजेपर्यंत डायरीला नोंदही झाली नव्हती. या प्रकारामुळे घटनास्थळी संताप व्यक्त केला जात होता.
रुईजवळ कापड गोदामाला आग
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST