कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १९२२ वाहनधारकांकडून दोन लाख ५० हजार ३०० इतका दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या २१० वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी जागीच ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहे. शनिवारी जिल्ह्यात सुमारे २१० वाहने जप्त करण्यात आली. ही वाहने कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर दंड भरुन परत देण्यात येणार आहेत. त्याशिवाय १९२२ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय ३६९ विनामास्कधारकांवर कारवाई करत ९७ हजार ४०० रुपये दंड वसूल केला.