सरूड : गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत असलेल्या सरूड (ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून अद्ययावत रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे .
सरूड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सरूडसह शिंपे, सौते, वडगाव वारणा कापशी, शिवारे, वाडीचरण, चरण सैदापूर, थेरगाव आदी गावांचा समावेश आहे . आरोग्य केंद्रामध्ये दैनंदिन सुमारे ९० ते १०० रुग्ण औषधोपचारासाठी येतात, तर दरमहा नऊ ते दहा स्त्रियांची प्रसूती होते. हे आरोग्य केंद्र सुरू झाल्यापासून कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियाही येथे होत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या सोयीसुविधेच्या दृष्टीने या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिकेची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे होते. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना दुसऱ्या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागत होते; परंतु अनेक वेळा या रुग्णवाहिकाही वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. काही वेळा खासगी वाहनांतून रुग्णांची ने-आण करावी लागत होती. याचा आर्थिक भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत होता. त्यामुळे रुग्णांची ही होणारी गैरसोय दूर होण्याच्या दृष्टीने सरूड आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिकेची मागणी गेल्या तीन वर्षांपासून वारंवार होत होती. रुग्णांच्या या मागणीचा विचार करून माजी आमदार सत्यजित पाटील व जि. प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी रुग्णवाहिकेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने सरूड आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळाली आहे .
दरम्यान, नवीन रुग्णवाहिकेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जि. प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील, सभापती सुनीता पारळे, उपसभापती विजय खोत, पं. स. सदस्य दिलीप पाटील कोतोलीकर, सरपंच राजकुंवर पाटील, उपसरपंच भगवान नांगरे आदी उपस्थित होते.
‘लोकमत’चाही पाठपुरावा
सरूड आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका मिळावी यासंदर्भात ‘लोकमत’ने गेल्या २५ ऑगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून ‘लोकमत’चेही अभिनंदन होत आहे.