पलूस : पलूस येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सचिन लालासाहेब जावीर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी विद्यालयाचे प्राचार्य अशोक सिध्दय्या साळी, हाऊस मास्टर बाळासाहेब रावसाहेब खेडकर यांच्यावर रात्री पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सचिनने रॅगिंगमुळेच आत्महत्या केल्याची फिर्याद त्याचे वडील लालासाहेब जावीर यांनी दिली होती. सचिन जावीर याने गेल्या आठवड्यात नवोदय विद्यालयातील बदामाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी विद्यालय व्यवस्थापनाने सचिनची अभ्यासात प्रगती नव्हती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांत सांगितले होते, तर सचिनच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. चार दिवसांपूर्वी लालासाहेब जावीर यांनी सचिनच्या हस्ताक्षरातील पत्राचा आधार घेऊन तक्रार दाखल केली. त्याचे रॅगिंग झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत व जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन तक्रार केली होती. पोलीसप्रमुख सावंत यांनी तासगावच्या उपअधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी सुरू असतानाच रात्री उशिरा पलूस पोलीस ठाण्यात प्राचार्य अशोक साळी, हाऊसमास्टर बाळासाहेब खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)‘लोकमत’मुळे प्रकार उघडकीसजवाहर नवोदय विद्यालयातील सचिन जावीर याच्या आत्महत्या प्रकरणावर प्रथम ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. त्याचे वडील लालासाहेब जावीर यांनीही पुराव्यासह रॅगिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला.
प्राचार्यांसह दोघांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: December 15, 2014 00:23 IST