परळे (ता. शाहूवाडी) येथील आरोपींना न्यायालयीन नोटीस बजावण्यास गेलेल्या शाहूवाडी न्यायालयातील बेलिफ श्रीधर विठ्ठल कुंभार (रा. मोहरे, ता. पन्हाळा) यांना शिवीगाळ करून कानशिलात मारून धमकी दिल्याप्रकरणी श्रद्धा विश्वास पाटील, बळीराम विश्वास पाटील, विश्वास बळीराम पाटील या तिघांविरोधांत शाहूवाडी पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीधर कुंभार हे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोल्हापूर येथील वाय. एम. खरादी यांच्या न्यायालयातील दिवाणी किरकोळ अर्ज २५०/२०२० ची नोटीस बजावण्यासाठी गेले असता, आरोपींनी नोटीस घेण्यास घेण्यास विरोध करून शिवीगाळ करून श्रद्धा पाटील हिने कुंभार यांच्या पाठीमागून येऊन कानशिलात मारले, तर बळीराम व विश्वास यांनी तुम्ही विरोधी पार्टीकडून पैसे घेऊन मदत करता, एकेकाला बघून घेतो, अशी धमकी दिली. आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास फौजदार प्रियांका सराटे करीत आहेत.