कोल्हापूर : गणेशाचे स्वागत परंपरेने चुरमुऱ्यांच्या उधळणीने केले जाते. त्यामुळे ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेवेळी चुरमुऱ्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे मुंबई, गुजरात, आंध्र प्रदेश, कोकण, बेळगाव, चिकमंगळूर, संकेश्वर, स्थानिक असा १५ टनांहून अधिक चुरमुरा स्थानिक बाजारात आला आहे. त्याची उलाढालही साडेचार कोटी रुपयांपर्यंत होते. उधळणीबरोबर प्रसादासाठीही आलसिगिरी हा चुरमुराही बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे.
गणेशोत्सवामध्ये सर्वसाधारणपणे नियमित मागणीपेक्षा चुरमुऱ्याला मोठी मागणी असते. विशेषत: गणेशमूर्तींवर उधळणीकरिता बेळगावी व इटान नावाचा चुरमुरा आणि खोबऱ्याबरोबर प्रसाद म्हणून आलसगिरी चुरमुरा कोल्हापुरातील बाजारात दाखल होतो. या चुरमुऱ्याला गणेशभक्तांकडून अधिक मागणी असते. मागणी लक्षात घेऊन उत्पादकही त्याची तयारी सर्वसाधारणपणे मे महिन्यापासून करतात. सर्वसाधारणपणे नियमित उत्पादनापेक्षा जादा उत्पादन केवळ गणेशोत्सवाकरिता केले जाते. कोरोना संसर्गापूर्वीच्या गणेशोत्सवासाठी किमान ३० टन चुरमुरा कोल्हापुरात खपत होता. मात्र, पहिल्या कोरोनाच्या लाटेनंतर यात घट झाली असून, यंदा मागणी निम्म्यावर म्हणजेच १५ टनांवर आली आहे. तरीसुद्धा उत्पादक व विक्रेत्यांना गणेशोत्सवकाळात चुरमुऱ्याला आणखी मागणी वाढेल, अशी आशा आहे.
आलासीगिरी तांदळाच्याच चुरमुऱ्यांना मागणी अधिक
चिकमंगळूर (कर्नाटक) येथील तांदळाची प्रसिद्ध जात असलेल्या आलासगिरी तांदूळ खास गणेशोत्सवातील प्रसाद आणि भडंगेसाठी वापरला जातो. हा चुरमुरा जवारी असल्यामुळे त्याला चव चांगली असते. त्यास दिवसाकाठी मोठी मागणी असते. सर्वाधिक खप असल्याने सर्वत्र या चुरमुऱ्याला मोठी मागणी असते.
कोट
चिकमंगळूर येथील आलासगिरी नावाचा प्रसिद्ध तांदूळ आहे. या तांदळापासून बनविलेल्या चुरमुऱ्यांना कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मोठी मागणी आहे. विशेषत: गणेशोत्सवकाळात ही मागणी वाढते. यासह भडंगेसाठी हा चुरमुरा प्रसिद्ध आहे.
- मन्सूर मुलाणी, चुरमुरा घाऊक व्यापारी, कोल्हापूर
पाइंटर
- सावकर नावाच्या तांदळापासून सावकर नावाचा चुरमुरा बनविला जातो. हा चुरमुरा मोठा असतो.
- बेळगाव येथील सुल्तान व नमस्ते इटान नावाच्या तांदळाच्या जातीपासून हा चुरमुरा बनविला जातो. याचा वापर विशेषत: प्रसादासाठी केला जातो.
- आंध्र प्रदेशातून लाल रंगाचा हलका चुरमुराही बाजारात उपलब्ध आहे. हा जास्त काळ टिकतो.
- सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आदी भागांत भडंगेसाठी खास आलासगिरी व जवारी चुरमुऱ्याला मागणी अधिक आहे.
- खास उधळणीसाठी इटान नावाचा चुरमुरा वापरला जातो. याला केवळ गणेशोत्सवकाळात मागणी असते.
फोटो : १२०९२०२१-कोल-चिरमुरा
(छाया : नसीर अत्तार)