कोल्हापूर : रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर व्हावा यासाठी खरीप २०२१ मध्ये खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.
याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, सोयाबीन, कापूस, ऊस इत्यादीकरिता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे. जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा वापर करणे, जैविक खतांची बीज प्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाणाचे अनुदानावर वितरण करणे, भात पिकाकरिता युरिया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, उसाचे पाचट जागेवर कुजविणे, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर वाढवून रासायनिक खतांची मागणी कमी करणे यांचा समावेश आहे. तरी या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
---