कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या, गुरुवारी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा काढणार असल्याची माहिती सतीशचंद्र कांबळे व चंद्रकांत यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रकांत यादव म्हणाले, केंद्र सरकारचे कायदे हे शेतकरीविरोधी असून यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. त्यांना कडाडून विरोध होऊनही सरकार मागे हटण्यास तयार नाही. गेला महिना, सव्वा महिना लाखो शेतकरी दिल्लीमध्ये बसले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून शंभरहून अधिक शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला घाबरल्याने मध्यप्रदेशमध्ये आंदोलकांना रोखले जात आहे. दुसरा टप्पा म्हणून शेतकरी उद्या, गुरुवारी सकाळी नऊ वाजता सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथून आत्मक्लेश यात्रा सुरू करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता तीस किलोमीटरचे अंतर कापत यात्रा पापाची तिकटी येथे येणार आहे. येथे महात्मा गांधीजींच्या पायांशी यात्रा नतमस्तक हाेणार आहे. या यात्रेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सतीशचंद्र कांबळे व चंद्रकांत यादव यांनी केले आहे. यावेळी ‘शेकाप’चे चिटणीस बाबूराव कदम, दिलदार मुजावर उपस्थित होते.