कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गूळ उत्पादक शेतकरी, गूळ खरेदीदार यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला; पण यामध्ये अडत दुकानदार सहभागी न झाल्याने या कराराला अंतिम स्वरूप आले नाही. गूळ नियमन रद्द झाल्याने आगामी हंगामात बाजार समितीने मध्यस्थीची भूमिका घेत हा करार केला आहे. गूळ नियमन रद्द झाल्याने आगामी हंगामाबाबत पेच निर्माण झाला आहे. यासाठी गेल्या आठवड्यात शेतकरी, अडते, खरेदीदारांमध्ये बैठक होऊन बाजार समितीने मध्यस्थीची भूमिका घेण्याची विनंती केली होती; पण शेतकऱ्यांनी तीन टक्के अडत कमी करण्याची मागणी केली होती. त्याला अडत्यांनी विरोध केला आहे. आज, मंगळवारी पुन्हा या विषयावर बैठकीचे आयोजन केले होते. अडते नसल्याने अडत किती घ्यायची यावर चर्चा झाली नाही; पण सामंजस्य कराराचा मसुदा शेतकरी व खरेदीदारांना वाचून दाखविण्यात आला. त्यांनी याला सहमती दर्शविली. बैठकीला अशासकीय मंडळाचे अध्यक्ष आर. के. पोवार, उपाध्यक्ष निवास पाटील, सचिव संपतराव पाटील, सहसचिव मोहन सालपे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, भगवान काटे, आदम मुजावर, गूळ उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील-कोपार्डेकर यांच्यासह खरेदीदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)विलंब शुल्क रद्दसाठी अडत्यांचा प्रयत्नतीन महिन्यांपूर्वी प्रशासकांनी वाढीव शुल्कचा निर्णय घेतला होता; पण त्याला चार - पाच अडत्यांनी विरोध करत थेट पणन संचालकांकडे तक्रारही केली होती. यावर निर्णय प्रलंबित असताना या अडत्यांनी विलंब शुल्क रद्द करून लायसन्स फी भरून घेण्याची मागणी केली आहे; पण समितीने नकार दिल्याने बैठकीला अनुपस्थित राहून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.
शेतकरी, गूळ खरेदीदारात सामंजस्य करार
By admin | Updated: September 3, 2014 00:27 IST