कोल्हापूर : बेले (ता. करवीर) येथे कौटुंबिक वादातून मंगळवारी सकाळी दहा वाजता दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे चौघेजण गंभीर जखमी झाले. पांडुरंग हरी लांबोरे (वय ३९), तुकाराम हरी लांबोरे (५२), रोहित रघुनाथ लांबोरे (२१) व रंगराव दत्तू भोईटे जखमी असून, त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. तुकाराम लांबोरे व रंगराव भोईटे यांच्यात दीड वर्षापूर्वी कौटुंबिक कारणातून वादावादी झाली होती. तेव्हापासून हा वाद धुमसत होता. तुकाराम लांबोरे यांचे भाऊ पांडुरंग हे सैन्यात नोकरीस असून ते काही दिवसांपूर्वी सुटीवर गावी आले आहेत. मंगळवारी ते भोईटे यांच्या दारातून जात असताना त्यांच्यात वादावादी होऊन हाणामारी झाली. त्यामध्ये हे सर्वजण जखमी झाले. जखमी तुकाराम लांबोरे यांनी रंगराव भोईटे, मारुती दत्तू भोईटे, वैभव मारुती भोईटे, संग्राम एकनाथ लांबोरे, आदींनी मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले; तर भोईटे यांनी पांडुरंग लांबोरे, रोहित लांबोरे, तुकाराम लांबोरे यांनी मारहाण केल्याचे सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
कौटुंबिक वादातून दोन गटांत हाणामारी
By admin | Updated: April 15, 2015 00:39 IST