लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सरकी तेलाच्या दरात हळूहळू घसरण होऊ लागली आहे. किरकोळ बाजारात १६५ वरून १५० रुपये प्रतिलीटर दर आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. फळमार्केटमध्ये अननस, पेरूसह तोतापुरी आंब्याची रेलचेल वाढली आहे. कडधान्य मार्केटमध्ये हरभरा डाळीच्या दरात थोडी घसरण झाली आहे.
गेल्या महिन्याभरात गोडे तेलाने चांगलीच उसळी घेतली होती. किरकोळ बाजारात सरकी तेल १६५ रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने गृहिणींना फोडणी देताना जपूनच द्यावी लागत आहे. मात्र गेल्या पाच-सहा दिवसात गोडे तेलाच्या दरात काहीशी घसरण सुरू झाली आहे. सरकी तेल १५० रुपये किलोपर्यंत खाली आले असून दरात आणखी घसरण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
कडधान्य मार्केटमध्ये सध्या शांतता आहे. तूर डाळ, मूग डाळ, मुगाचे दर स्थिर आहेत. हरभरा डाळीच्या दरात काहीशी घसरण झाली असून ७० रुपये किलो दर राहिला आहे. ज्वारीचे दर कायम असून प्रतिकिलो ३० ते ५० रुपयांपर्यंत आहे. शाबूच्या दरात थोडी वाढ दिसत आहे. साखरेचे दर स्थिर असून किरकोळ बाजारात ३५ रुपये किलो दर राहिला आहे.
भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर थोडी कमी झाले आहेत. कोबी, वांगी, कारली, भेंडी या भाज्यांचे दर स्थिर आहेत. टोमॅटो, ढब्बू, गवार, वरणा, दोडक्याच्या दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात वरणा ५५ वरून ४०, वाल ६५ वरून ४० तर बिनीस ६५ वरून ४५ रुपये झाला आहे. प्लॉवरचा दरदाम कायम असून कोथिंबीरच्या दरात थोडी घसरण झाली आहे. मेथीसह इतर भाजीपाला मात्र तेजीत आहे. घाऊक बाजारात मेथी १५ रुपये झाली आहे.
कांदा-बटाटा स्थिर
कांदा व बटाट्याच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. या आठवड्यात बाजार समितीत कांद्याची आवक चांगली राहिल्याने दर स्थिर राहिले. किरकोळ बाजारात कांदा सरासरी २० तर बटाटा २५ रुपये किलो आहे.
घाऊक बाजारात प्रमुख भाज्यांचे दर प्रतिकिलो असे -
कोबी -७.५०, वांगी -३०, टोमॅटो-७.००, ढब्बू -२२.५०, गवार -४०, कारली - ३०, भेंडी -२० वरणा -४०, दोडका -२५, वाल -४०, बिनीस -४५.