घन:शाम कुंभार - यड्राव -नांदणी परिसरासह महाराष्ट्रातील नाशिक, मंचर भागातून मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात फ्लॉवरची आवक वाढल्याने चार दिवसांत दरात मोठी घसरण झाली आहे. याचा फटका फ्लॉवर उत्पादकांना बसत आहे. त्यांना उत्पादन खर्चाशी ताळमेळ घालणे अवघड बनले आहे. फ्लॉवरला मिळणारा दर कमी झाला तरीही मुंबई बाजारापर्यंत वाहतुकीचा खर्च मात्र तेवढाच सोसावा लागणार आहे. या उतरलेल्या दरामुळे फ्लॉवर उत्पादक आर्थिक चक्रात सापडला आहे.शिरोळ तालुक्यातील नांदणी, दानोळी, मजरेवाडी या भागातून फ्लॉवर मुंबई, वाशी येथील बाजारात मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येतो, परंतु येथे महाराष्ट्रातील नाशिक, मंचर, संगमनेर भागातूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॉवरची आवक होत असल्याने फ्लॉवरच्या दरात घसरण सुरू झाली आहे.चार दिवसांपूर्वी प्रती दहा किलो एकशे साठ रुपये दर असताना फ्लॉवरचा दर प्रती दहा किलो शंभर रुपयांपर्यंत खाली आला आहे. या दर घसरणीमुळे उत्पादन खर्चाचा ताळमेळही बसत नाही. बाजारापर्यंतचा वाहतूक खर्च उत्पादकांना सोसावा लागणार आहे.मे महिन्याच्या शेवटी फ्लॉवरची लागण केली जाते. लागण केल्यापासून सत्तर दिवसांनंतर फ्लॉवर काढण्यास तयार होतो. तेथून पुढे पंधरा दिवस काढणी होते. धूपकाली जातीचा फ्लॉवर मे ते जुलै यामध्ये येतो, तर कातकी जातीचे आॅगस्ट ते नोव्हेंबरमध्ये उत्पादन घेतात. गड्डे लहान असल्याने मुंबई बाजारात त्यास मोठी मागणी असते, तर व्हरायटी जातीच्या फ्लॉवरचे गड्डे मोठे असल्याने त्याची स्थानिक बाजारपेठेत नगावर विक्री होते.नांदणी परिसरात सुमारे चारशे एकर, दानोळी भागात दोनशे एकर, तर मजरेवाडी भागात ३० एकर क्षेत्रात फ्लॉवरचे उत्पादन घेण्यात येते. सरासरी प्रती एकर बारा टन उत्पादन होते. मान्सून पूर्व पाऊस झाल्यास फ्लॉवरची झपाट्याने वाढ होते व मोठ्या आकारात फुलते. अशा फ्लॉवरला दर कमी मिळतो. एक एकर फ्लॉवर लावण्यासाठी मशागतीचा खर्च सात हजार, बियाणे पाच हजार, मजुरी पंधरा हजार, औषध व खते पंचवीस हजार, पाणीपट्टी तीन हजार असा खर्च उत्पादन येईपर्यंत आहे, तर उत्पादन आल्यावर मुबंई-वाशी बाजारापर्यंत फ्लॉवर जाण्यासाठी प्रती किलो दोन रुपये, टोलसाठी पाच रुपये, हमाली २५ पैसे असा खर्च येतो. नांदणी येथील नोंदणीकृत असलेल्या नांदणी भाजीपाला व फळफळावळ उत्पादक सहकारी संघ, भैरवनाथ भाजीपाला संघ, जयकिसान व शेतकरी भाजीपाला संघाच्यावतीने येथील फ्लॉवर मुबंई, अहमदाबाद, नागपूरसह अन्य बाजारपेठेत पाठविण्यात येतो. संघाच्यावतीने उत्पादकाला पॅकिंग मटेरियल, औषधे, खते व बियाणे पुरवठा करण्यात येतो. याचबरोबर व्यापाऱ्याकडून मिळणाऱ्या बिलाची जबाबदारी संघ घेत आहे. हवामानाच्या बदलानुसार परिणाम करणारा भाजीपाला उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यामुळे दरातील चढ-उताराचा फटका उत्पादकांनाच सहन करावा लागतो. फ्लॉवर दराची घसरण, उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड झाल्याने फ्लॉवर उत्पादक आर्थिक चक्रात सापडला आहे.उत्पादन खर्चाशी ताळमेळ घालणे बनले अवघड दर घसरला तरीही मुंबई बाजारापर्यंत वाहतुकीचा खर्च मात्र तेवढाच सोसावा लागणार दर प्रती दहा किलो शंभर रुपयेपर्यंत खाली
फ्लॉवर उत्पादकांना दर घसरणीचा फटका
By admin | Updated: July 15, 2015 21:24 IST