कोल्हापूर : कोविड काळामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सर्वेक्षणासह अन्य कामे केली असताना, त्यांना केवळ एक महिन्याचेच १ हजार रुपये मानधन देण्यात आले आहे. त्यानंतरही त्यांनी सहा महिने काम केल्याने उर्वरित सहा महिन्यांचे मानधन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या कोल्हापूर शाखेने केली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांची युनियनच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतींना हे मानधन देण्याबाबत आदेश द्यावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सातत्याने मोबाईलवर माहिती भरण्याची सक्ती करू नये, किरकोळ खर्चाच्या पावत्या न मागता व्हाऊचरवर सह्या घ्याव्यात, अंगणवाड्यांसाठी पाठवण्यात येणाऱ्या साहित्याचे वाहनभाडे अंगणवाडी सेविकेकडून घेऊ नये, रिक्त पदे भरावीत, वेळ निघून गेल्यावर बेबी कीट देऊ नयेत, पंचायत समितीने वाटलेल्या साहित्याची कागदपत्रे लाभार्थ्यांकडून गोळा करण्याची सक्ती करू नये, माझे कुटुंब माझी जबाबदारीचे मानधन अदा करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
युनियनचे राज्य सरचिटणीस कॉ. नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली शुभांगी पाटील, वर्षा लवटे, भारती चव्हाण, आक्काताई पाटील यांच्यासह सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
२९१२२०२० कोल झेडपी ०१
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध मागण्यांचे निवेदन कॉ. नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना दिले.
छाया : आदित्य वेल्हाळ