वडणगे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही राज्यात या अभियानाची सुरुवात १५ आॅक्टोबरला भ्रष्टाचारी आघाडी सरकारला घालवून करा. राज्यावर नव्या दमाचे व विचारांचे भाजपचे सरकार बहुमताने आणा, असे आवाहन केंद्रीय पर्यटन व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. निगवे दुमाला (ता. करवीर) येथे भाजपचे उमेदवार केरबा श्रीपती चौगले यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महादेव एकशिंगे होते.यावेळी जावडेकर म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. ऊस दरासाठी मागील वर्षी केलेल्या आंदोलनावेळी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून तुरुंगात टाकले. यामुळे लाखो शेतकरी बांधवांनी काळी दिवाळी साजरी केली. त्याच कुटुंबीयांनी या दिवाळीत आघाडी सरकारला काळी दिवाळी साजरी करावयाला लावावी.यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भाजपने मोदींसारख्या ओबीसी समाजातील व्यक्तीला पंतप्रधान केले आहे. के. एस. चौगले म्हणाले, मी धनशक्तीच्या नाही, तर जनशक्तीच्या जोरावर विजयी होईन, असा मला विश्वास आहे. यावेळी रामभाऊ चव्हाण, भगवान काटे, संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बाबा देसाई, संभाजी पाटील, राजाराम शिपुगडे, आनंदराव पवळ, शिवाजी पाटील, दिलीप एकशिंगे, अमित कांबळे, नंदकुमार पोवार, मधुकर दुधाणे, महादेव भोसले, बाळासाहेब राणगे, शैलेजा पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.
आघाडी सरकारला हद्दपार करा
By admin | Updated: October 12, 2014 23:32 IST