लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरूळ : आमशी (ता. करवीर) येथील शिवाजी देवबा पाटील (८२) व ज्ञानू सखाराम पाटील (७५) या दोन जिवलग मित्रांच्या बारा तासांच्या आत झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हे दोघे नात्याने चुलत भाऊ असले तरी गेल्या चाळीस वर्षांत त्यांच्यात असलेली मैत्री इतकी घट्ट होती की, एका मित्राचे निधन झाल्यानंतर दुसरा मित्राने बारा तासांच्या आतच हृदयविकाराच्या धक्क्याने जगाचा निरोप घेतला.
शिवाजी पाटील यांचे मंगळवारी (दि. २०) दुपारी दोन वाजता हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. ही बातमी त्यांचे जिवलग मत्र ज्ञानू पाटील यांना समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. मित्राचा विरह त्यांना सहन न झाल्याने त्यांचा अवघ्या बारा तासांत हृदयविकाराने मृत्यू झाला. शेतातील काम असोत अथवा गावातील सामाजिक काम ‘शिवा-ज्ञानू’ची जोडी नेहमी पुढे असायची, नात्याने चुलत भाऊ असले तरी गेली चाळीस वर्षे जिवलग मित्रांप्रमाणे राहिले, त्यामुळेच दोघांनीही सोबतच जगाचा निरोप घेतला.