कोल्हापूर : इंधन दरवाढीचा परिणाम बांधकाम क्षेत्रातील साहित्यांच्या दरवाढीवर झाला आहे. गेल्या वर्षातील फेब्रुवारीमधील दरांच्या तुलनेत सिमेंट, सळी, वाळू, आदी साहित्याच्या दरामध्ये १० ते १५ टक्क्यांची यावर्षी वाढ झाली आहे. त्यामुळे घर उभारणी, व्यावसायिक कारणासाठी लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम करणाऱ्यांची दमछाक होत आहे.
जाचक अटींतील सुधारणांमुळे मिळालेला दिलासा, मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे ग्राहकांकडून घरांना वाढलेली मागणी, यामुळे कोरोनाचा विळखा सोडवून कोल्हापूरचे बांधकाम क्षेत्र भरारी घेण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांची मागणी वाढली आहे. सध्या शहरातील विविध ठिकाणी ६० प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात वैयक्तिक स्वरूपात काही नागरिक घर दुरुस्ती, नवीन घराची उभारणी करत आहेत. मात्र, डिझेल, पेट्रोल, गॅस या इंधनाच्या दरवाढीमुळे सिमेंट, वाळू, आदी साहित्याच्या दरांमध्ये यंदा वाढ झाली आहे. त्यात वाळूचा एका ट्रकमागे तीन हजार रुपयांची, सिमेंट पोते ७० रुपयांची, सळी प्रतिटन ११,८०० रुपयांची, एएसी ब्लॉक्स प्रति घनमीटर आणि टाइल्सचे दर प्रतिचौरस फुटाला दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. भाजी व विटा, प्लबिंग, इलेक्ट्रिकल साहित्याचे दर ५ ते १० टक्क्यांनी आणि कामगारांच्या मजुरीमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्राहकांनी नोंदणी करताना निश्चिती केलेल्या रकमेमध्येच त्यांना फ्लॅट, रो-बंगलो, दुकाने, आदी बांधकाम व्यावसायिक, विकसकांना द्यावे लागतात. त्यामुळे साहित्याचे दर वाढल्याने त्यांना प्रकल्प पूर्ण करताना त्यांची आर्थिक दमछाक होत आहे.
पाॅइंटर
साहित्य गेल्या वर्षीचे दर यावर्षीचे दर
वाळू (प्रतिट्रक) २७,००० २९,०००
सिमेंट (प्रति पोते) २६० ३३०
सळी (प्रतिटन) ४५,००० ५६,८००
एएसी ब्लॉक्स (प्रति घनमीटर) ३२७५ ३४७५
टाईल्स (प्रति चौरस फूट) ४६००० ४८०५०
प्रतिक्रिया
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बांधकाम क्षेत्राला लागणाऱ्या सर्वच साहित्याचे दर वाढले आहेत. मजुरीमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक, विकसकांनी निश्चित केलेल्या बजेटमध्ये काम पूर्ण करण्याची कसरत करावी लागत आहे. या साहित्याचे दर कमी झाल्यास बांधकाम क्षेत्राला बळ मिळणार आहे. त्यामुळे दर कमी करून ते स्थिर ठेवण्याबाबत क्रिडाईच्या माध्यमातून आमचा सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
-विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर.
चौकट
तडजोड करावी लागते
बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज अथवा स्वत: केलेल्या बचतीच्या रकमेतून वैयक्तिक स्वरूपामध्ये घर साकारताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यांना घरासाठी लागणाऱ्या साहित्याचा वापर आणि गुणवत्तेमध्ये तडजोड करावी लागत असल्याचे चित्र आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
सध्या शहरात सुरू असलेले बांधकाम प्रकल्प : ६०
तयार असलेल्या घरांची संख्या : सुमारे ५००
परवाने मिळाल्यानंतर बांधकाम सुरू होणारे प्रकल्प : १२५
या प्रकल्पांच्या माध्यमातून भविष्यात उपलब्ध होणारी घरे : १५००