कोल्हापूर : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा देण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शिवाजी विद्यापीठाकडून गुरुवार (दि. १५) पासून सुरू होणार आहे. त्याचे सुधारित वेळापत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
विद्यापीठाने दि. २२ मार्चपासून हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू केल्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीतील परीक्षा स्थगित केल्या. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सुमारे ५४ हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्याचा पर्याय निवडला होता. कोरोनामुळे या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यासह ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देण्याचा पर्याय निवडावा, असे आवाहन केले. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पर्याय निवडला आहे. हा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा गुरुवारपासून होणार आहे. त्यामध्ये द्वितीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बीएस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.
चौकट
ऑनलाईन परीक्षेसाठी ९८ हजार विद्यार्थी
विद्यापीठाने परीक्षा स्थगित करण्यापूर्वी ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी ५४ हजार विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला होता. विद्यापीठाने पर्याय बदलण्याचे आवाहन केल्यानंतर गेल्या आठवड्यात ३७ हजार जणांनी पर्याय बदलला आहे. त्यामुळे यापूर्वी आणि आताचे मिळून एकत्रितपणे ९८ हजार ३०० विद्यार्थी ऑनलाईन, तर १७ हजार विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत.
चौकट
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन परीक्षा
औषधनिर्माणशास्त्र, विधी, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, वस्तुनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन स्वरूपात घेण्यात याव्यात. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित महाविद्यालयांनी घ्यावी, अशी सूचना परीक्षा मंडळाने या महाविद्यालयांना सोमवारी केली आहे.