अमर पाटील : कळंबा
रंकाळा तलावालगत वसलेल्या राजलक्ष्मीनगर, तपोवन, सुर्वेनगर, सानेगुरुजी वसाहत, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, कणेरकरनगर, फुलेवाडी रिंगरोड, कळंबा कारागृह प्रभागातील नागरिकांसाठी दरवर्षी पावसाळा अंगावर शहारे आणणारा ठरतो. प्रतिवर्षी निम्म्याहून अधिक उपनगरातील नागरी वस्तीत घरात पावसाचे पाणी शिरते. सुर्वेनगर प्रभागात जवळपास सर्वच नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते.
रंकाळ्यालगत वसलेल्या या उपनगरांची भौगोलिक रचना विचित्र आहे. सत्तर टक्के उपनगरे सखल भागात वसली असल्याने स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट प्रकल्पाची खरी गरज येथे आहे. या उपनगरातील प्रभागात नैसर्गिक नाले वाहत असून नालेसफाईअभावी पावसाळ्यात पाण्याचे निर्गतीकरण होत नसल्याने नागरी वस्तीत पाणी शिरते. अंतर्गत गटारी, अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाईन विकसित करण्यात आल्या नसल्याने पाणी नागरी वस्तीत शिरते.
पावसाचे पाणी निर्गतीकरण करणारे नैसर्गिक नाले गटारे बनली आहेत.
पांडुरंग नगरी लगतचा नाला अतिक्रमण करून गायब करण्यात आला आहे. श्रीकृष्ण कॉलनी नजीकचा पंधरा फुटी नाला अतिक्रमण करून सहा फुटांचा झालाय. जीवबानाना पार्क प्रभागात तर नाल्यावर इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येते. दरवर्षी वाहतुकीच्या वर्दळीच्या क्रेशर चौक ते संभाजीनगर, देवकर पाणंद ते साळोखेनगर रस्त्यावर गुडघ्यावर पाणी असते त्यामुळे जनजीवन ठप्प होते.
पालिका प्रशासनाची उदासीनता व लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे स्वतंत्र स्टॉर्मवॉटर मॅनेजमेंट प्रकल्प राबवून नागरिकांचा पावसाळा सुखावह होणार केव्हा, याचे उत्तर प्रशासनास माहीत.
प्रतिक्रिया
स्टॉर्म वॉटर प्रकल्प राजेंद्रनगर परिसरासाठी राबविण्यात आला. वास्तविक याची खरी गरज रंकाळ्यालगतच्या उपनगरात होती. पालिकेने स्वतंत्र निधी उभारावा अथवा शासनाकडून निधी उपलब्ध करून हा प्रश्न निकाली काढावा. प्रशासनाने नैसर्गिक नाले अतिक्रमणमुक्त करत नालेसफाई करून नैसर्गिक प्रवाह कायम वाहते ठेवावेत.
- सुभाष रामुगडे, माजी नगरसेवक