जयसिंगपूर : मतदानासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांकडून घर टू घर प्रचार जोमात सुरू आहे. निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण निघणार असल्याने एखाद्या गटाचे बहुमत झाले तर त्याच्या सदस्यामधील आरक्षण निघाले नाही तर सरपंच करायचे कुणाला, यासह अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बहुमत आले तरीही नशिबावर अवलंबून रहावे लागणार आहे.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर घेण्याची घोषणा आयोगाने केल्यानंतर अनेकांच्या इच्छेवर विरजण पडले आहे. मात्र गेल्या १५ वर्षातील आरक्षणाचा अंदाज घेत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. सरपंच पदावरून उलाढालही ठरलेलीच असते. सध्या प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरण ढवळून निघत आहे. बहुमतासाठी गावातील पुढा-यांनी व्यूहरचना आखली आहे. सरपंच आरक्षणाचे नंतर बघू, मात्र ग्रामपंचायतीवर आपल्याच आघाडीचा झेंडा फडकविण्याचा चंग नेत्यांनी बांधला आहे.
सरपंच आरक्षण असेल त्या प्रवर्गाचे अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात बघायला मिळायचे. सरपंच पदासाठी मोठी स्पर्धा असायची. त्यामुळे निवडणुका चुरशीने व्हायच्या. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे एखादे गटाचे बहुमत होऊनही सरपंच पदासाठी त्यांना आरक्षणाच्या नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे, असेच चित्र सध्या तरी आहे.
..............
जर तर वर गणिते
बहुमत मिळूनही आरक्षण विरोधकांच्या सदस्याच्या हाती गेले तर सरपंच करायचे कुणाला, असा मोठा पेचदेखील उभा राहणार आहे. त्यामुळे जर तर वरची गणिते मांडत उमेदवारांसह नेतेमंडळीकडून प्रचार सुरू आहे.