कोल्हापूर : राज्य शासनाने एकीकडे ‘हाफकिन’ कडूनच औषधे घेण्याचे घातलेले बंधन आणि एकाचवेळी तेथून पुरवठा होत नसल्याची वस्तुस्थिती यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कात्रीत सापडला आहे. ९ एप्रिल २०२१ रोजी मागणी करूनही अजून एक औषधाची गोळीदेखील जिल्हा परिषदेला मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरलाही औषध पुरवठा करताना आरोग्य विभागाला अडचणी येत आहेत.
आरोग्य विभागाने ९ एप्रिल २०२१ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे औषधांची मागणी नोंदवली. ४२ प्रकारची गरजेची औषधे यामध्ये नोंदवण्यात आली. कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेची एकत्र मागणी करून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाकडून २३ एप्रिल रोजी ही मागणी ‘हाफकिन’कडे नोंदवण्यात आली. तरीही ४ मे पर्यंत जिल्हा परिषदेला औषधे मिळाली नाहीत.
अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी हातावर हात न बांधता पुन्हा नवीन प्रस्ताव तयार केला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील सध्याची कोरोनाची गंभीर होत असलेली स्थिती पाहून बाहेरून औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५० लाख रुपयांची औषधे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या दालनामध्ये मंगळवारी सायंकाळी खरेदी समितीची बैठक झाली.
हाफकिनचे दर, जीएम पोर्टलवरील दर, बाजारातील औषधांच्या किमती या सर्व बाबींचा तुलनात्मक अभ्यास करूनच मग ही औषधे खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात जिल्हा परिषदेला औषधे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.