कोल्हापूर : फुटबॉल म्हटले की, खेळाडूंमधील ईर्ष्या, वादावादी ही अपेक्षितच असते. यात केवळ नियमांचे अज्ञान असले की, मग या वादाला मारामारीची किनार लाभते. हाच मुद्दा घेऊन कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना नव्या ‘आॅफसाईड’ नियमाबद्दल शुक्रवारी प्रात्यक्षिकांसह प्रबोधन केले. फुटबॉल सामन्यांमध्ये सहायक पंचाने चुकीची ‘आॅफसाईड’ दिली म्हणून आमच्या संघाला गोल करता आला नाही, तर कधी प्रतिस्पर्धी संघाला खेळाडू एकटाच पुढे असताना ‘आॅफसाईड’ का दिली नाही, यावरून अनेकदा सामन्याच्या शेवटी किंवा सामन्यातच खेळाडूंमध्ये वादावादी होते. या वादावादीचे पर्यवसान कधी हाणामारीत होते. याचे लोण कधीकधी समर्थक प्रेक्षकांमध्ये जाते आणि मोठ्या हाणामारीत होते. नेमकी हीच बाब ओळखून यंदाच्या हंगामात ‘केएसए’च्यावतीने फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी, रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव, प्रदीप साळोखे यांनी शाहू स्टेडियम येथे खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्याकरिता शुक्रवारी दुपारी प्रात्यक्षिकांसह ‘आॅफसाईड’बद्दलचे प्रबोधन केले. यावेळी प्रमोद भोसले, राजू वायचळ, अभिजित वणिरे, नूर देसाई, बाबू पाटील, युवराज पाटील, अमर पाटील, नीलेश जाधव, ज्येष्ठ फुटबॉलपटू प्रकाश रेडेकर अशा १६ संघांच्या प्रतिनिधींसह ‘केएसए’चे फुटबॉल नोंदणी सचिव संभाजीराव मांगोरे-पाटील, आदी उपस्थित होते.
‘आॅफसाईड’ तंत्राबद्दल प्रबोधन
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST