लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : शेतात मजुरी करताना सापाने दंश केल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या हंचिनाळ तालुका निपाणी येथील महिलेने तब्बल १९ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
हंचिनाळ तालुका निपाणी येथील सौ. रूपाली अमृत ढाले (वय ३२) या गावालगत असणाऱ्या पाटील मळ्यात मोलमजुरी करण्यासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी उसाचा पाला काढत असताना त्यांच्या पायाला सापाने दंश केला. त्यावेळी त्यांनी आरडाओरड करताच सोबत असणाऱ्या महिलांनी जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना साप निघून जाताना दिसला. त्यानंतर त्यांना ताबडतोब बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर निपाणी येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाकडे नेण्यात आले तेथेही उपचारांची सोय उपलब्ध न झाल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये तब्बल १९ दिवस उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
रुपाली यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, दीर, जाऊ, सासू असा परिवार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असणाऱ्या रुपाली व त्यांचे पती दोघेही मोलमजुरी करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. रुग्णालयाचा आर्थिक खर्च होऊनही रुग्ण दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे हंचिनाळ व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.