कोल्हापूर : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पटीने वाढल्याने महापालिका अधिक दक्ष झाली असून मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजन टेस्टसह घर टू घर सर्वेक्षणाचा जोर वाढवण्यात आला आहे. शनिवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या भागातील ८५० घरांचे सर्वेक्षण करून ३९० नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. मार्केट यार्ड परिसरात मोबाईल व्हॅनद्वारे १२७ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली, त्यात ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, ११ वाजता दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही महाद्वार रोडवर आतल्या बाजूने दुकाने सुरू ठेवल्याचे आढळल्याने भरारी पथकाने दंडात्मक कारवाईदेखील केली.
कोल्हापूर शहरात रोज तीनशेच्या वर नवे कोरोनाग्रस्त सापडत असल्याने समूह संसर्गाच्या भीतीने महापालिका प्रशासन हादरले आहे. वारंवार आवाहन करूनदेखील लोक नियमांचे पालन करत नसल्याने कडक कारवाईस सुरुवात झाली आहे. शनिवारी प्रशासक कादंबरी बलकवडे व आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पाेळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन रुग्ण सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली. फिरंगाई तालीम, राजारामपुरी, शाहूनगर, दौलतनगर, मातंग वसाहत, भाविक विठोबा तालीम, गंगावेश, बाजारगेट, शिपुगडे तालीम, मस्कुती तलाव, दुधाळी पॅव्हेलियन, महाडिक माळ, टेंबलाई नाका, साईक्स एक्सन्टेशन, कदमवाडी येथील ८५० घरांतील ८ हजार ९०५ नागरिकांची तपासणी केली. लक्षणे आढळणाऱ्या ३९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.
एका बाजूला घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचा जोर वाढवला असताना रस्त्यांवर फिरणाऱ्यांची मोबाईल व्हॅनद्वारे अँटिजन टेस्ट करण्याचेही काम जोरात सुरू आहे. शनिवारी मार्केट यार्डात १२७ जणांची टेस्ट केली, त्यातील १२२ जण रिपोर्ट निगेटिव्ह, तर पाचजण पॉझिटिव्ह आढळले. ही तपासणी व कारवाईचा जोर वाढवला जाणार असल्याने नागरिकांनी अत्यावश्यकच्या नावाखाली रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.