गडहिंग्लज शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूच्या डॉक्टर्स कॉलनीत अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होते, ती तातडीने दूर करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, सीमाभागातील एक महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र म्हणून गडहिंग्लज शहराची ओळख आहे. शहरात सुमारे १०४ डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगडसह सीमाभागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी गडहिंग्लजला येतात.
डॉक्टर्स कॉलनीमध्ये विविध आजारांवर उपचार करणारे अनेक डॉक्टर्स, पॅथालॉजिक लॅब व औषध दुकाने आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. काही वाहनधारक आपली वाहने अस्ताव्यस्थपणे कुठेही लावून जातात.
त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेप्रमाणे डॉक्टर्स कॉलनीतही सम-विषम पद्धतीने पार्किंगचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात शिवसेना उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी, अनिल खवरे यांचा समावेश होता.
--------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना काशीनाथ गडकरी यांनी निवेदन दिले. यावेळी अनिल खवरे उपस्थित होते.
क्रमांक : ०५०४२०२१-गड-०५