कोल्हापूर : एकलव्य पब्लिक स्कूल व पन्हाळा पब्लिक स्कूल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेच्या जिल्हास्तरीय चौदा वर्षांखालील गटात अंतिम फेरी गाठली, तर मुलींमध्ये सतरा वर्षांखालील गटात काडसिद्धेश्वर हायस्कूल, संजीवन विद्यानिकेतन, हौसाबाई मगदूम स्कूल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवीत आगेकूच केली. कोल्हापुरातील रेसकोर्स येथील विभागीय क्रीडा संकुलात बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात चौदा वर्षांखालील गटात एकलव्य पब्लिक स्कूलने ग्रीन व्हॅली स्कूलचा टायब्रेकरवर ३-२ असा, तर पन्हाळा पब्लिक स्कूलने तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कूलचा टायब्रेकरवर २-१ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. सतरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये संजीवन विद्यानिकेतनने आदर्श विद्यालय, मिणचेचा २-० असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलने इचलकरंजी हायस्कूलचा ६-० असा पराभव केला. ग्रीन व्हॅलीकडून यश रावण व प्रेम काळे यांनी प्रत्येकी तीन गोल केले. तिसऱ्या सामन्यात संजीवन पब्लिक स्कूलने एम. आर. हायस्कूल(गडहिंग्लज)चा ३-० असा पराभव केला. चौथ्या सामन्यात ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलने गणपतराव चौगले स्कूलचा टायब्रेकरवर ३-२ असा पराभव केला. पाचव्या सामन्यात पन्हाळा पब्लिक स्कूलने डी. सी. नरके विद्यानिकेतनवर २-० अशी मात केली. पाचव्या सामन्यात विजयादेवी यादव इंटरनॅशनल स्कूलने दूधगंगा व्हॅली स्कूलचा १-० असा पराभव केला. सातव्या सामन्यात संजय घोडावत स्कूलने एकलव्य पब्लिक स्कूलचा २-० असा पराभव केला. सतरा वर्षांखालील मुलींमध्ये काडसिद्धेश्वर हायस्कूलने व्यंकटेश्वरा हायस्कूलचा ३-० असा पराभव केला. संजीवन विद्यानिकेतनने सांगरूळ हायस्कूलचा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव केला. हौसाबाई मगदूम स्कूलने बळवंतराव यादव हायस्कूलचा टायब्रेकरवर ३-२ असा पराभव करीत आगेकूच केली. (प्रतिनिधी)
‘एकलव्य’,‘पन्हाळा स्कूल’ अंतिम फेरीत
By admin | Updated: July 30, 2015 00:34 IST