कोल्हापूर : असीम त्याग व समर्पणाची शिकवण देणारी ईद उल अजहा अर्थात बकरी ईद बुधवारी जिल्ह्यात पारंपरिक उत्साहात साजरी झाली. मुसळधार पाऊस असतानाही कोरोनाची भीती दूर सारत एकमेकांना शुभेच्छा देत ईदचा आनंद द्विगुणित केला.
दरम्यान, सामुदायिक नमाजपठणावर निर्बंध असलेल्या दसरा चौकात मुस्लिम बोर्डिंगमध्ये मौलाना मोबिन बागवान यांनी पाच लोकांच्या उपस्थितीत खुदबा पठण करून कोरोनाचे मळभ दूर व्हावे, अशी प्रार्थना केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ईद सार्वजनिकरीत्या साजरी करण्यावर मर्यादा आल्याने घराघरात गोडधोड व जेवणावळी झडल्या. मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करता येत नसल्याने घरीच कुटुंबीयासमवेत खुदबा पठण झाले. त्यानंतर एकमेकांना शिरखुर्म्यासह कुर्बानीचा वाटा देऊन परस्परांतील संवाद वाढवला. पावसाचा जोर कायम असतानाही आप्तेष्टांना मिष्टान्न पुरवण्याची लगबग दिसत होती. कोरोनाचा संसर्ग असल्याने मास्कसह अन्य दक्षताही घेतली जात होती.
फोटो: २१०७२०२१-कोल-ईद
फोटो ओळ: कोरोनामुळे सामुदायिक नमाज पठणावर मर्यादा आल्याने बुधवारी साजऱ्या झालेल्या बकरी ईदनिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर पाऊसधारा झेलतच खुदबा पठण झाले.