संजय पारकर --राधानगरी येथील अभयारण्यातील इदरगंज पठार विविध प्रजातींच्या व रंगांच्या फुलांनी बहरले आहे; मात्र पर्यटकांना प्रवेशास बंदी असल्याने हे पुष्पसौंदर्य नजरेआड दडून राहत आहे. वन्यजीव विभागाचा येथील काही भाग टुरिझम क्षेत्र करण्याचा प्रस्ताव कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.दूधगंगा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे आठ ते दहा किलोमीटर आत हे पठार आहे. एका बाजूस काळम्मावाडी धरण व दुसऱ्या बाजूला पाटपन्हाळा, बनाचीवाडी परिसर असलेल्या डोंगरावर सुमारे दहा किलोमीटर हे पठार आहे. पावसाळा सुरू झाला की, या पठारावर असंख्य प्रकारच्या लहान वनस्पती, गवत उगवते. सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाला की, या वनस्पतींना वेगवेगळ््या रंगांची, आकर्षक फुले येतात. त्यामुळे संपूर्ण पठारावर जणू रंगबेरंगी गालिचा अंथरल्याचा भासच होतो. कास पठाराच्या तोडीस तोड असे येथील पुष्पसौंदर्य आहे. अभयारण्याच्या अतिसंवेदनशील भागात हे क्षेत्र असल्याने येथे मानवी वावराला बंदी आहे. वन्यजीव विभागाने येथे सात किलोमीटरचा जंगलभ्रमंती मार्ग तयार केला आहे. तसेच काही पाऊलवाटाही विकसित केल्या आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी काही काटेकोर बंधने पाळून पावसाळ््यात जुलै ते आॅक्टोबर या काळात निसर्गप्रेमी पर्यटकांना या परिसरात पायवाटेने भ्रमंतीसाठी मुभा द्यावी, असा प्रस्ताव वन्यजीव विभागाने दोन वर्षांपूर्वी पाठविला आहे. त्यानुसार येथे पाहणीही झाली. मात्र, याच पाहणी दरम्यान येथे बांबू पिटवायझ जातीच्या अतिजहाल विषारी व दुर्मीळ सापांचे अस्तित्व जाणवले होते. त्यामुळे या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाही. याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास या दुर्मीळ पुष्पसौंदर्याचा आनंद निसर्गप्रेमींना मिळणार आहे.
इदरगंज फुलले
By admin | Updated: September 18, 2015 23:34 IST