कोल्हापूर : मंगळवारी होणाऱ्या ईदची घोषणा करण्यासाठी चंद्रदर्शन अर्थात चाँद कमिटीची बैठक उद्या, सोमवारी मुस्लिम बोर्डिंग येथे सायंकाळी सात वाजता आयोजित केली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मौलाना मन्सूर असणार आहेत, अशी माहिती दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर यांनी दिली. मराठी, इंग्रजी वर्षाप्रमाणे इस्लामी वर्षामध्येही बारा महिने आहेत. यामध्ये रमजान महिन्याची पवित्र आणि शुद्ध आचरणाचा महिना म्हणून इस्लाम धर्मात ओळख आहे. याप्रमाणे २१, २३, २५, २७, २९ या तारखेच्या रात्रींना मोठे महत्त्व आहे. याला ‘लैलतुल कद्र’ असे संबोधले जाते. याचप्रमाणे चंद्रदर्शन कमिटीच्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. या बैठकीत ईदचा चाँद दिसल्याची माहिती महाराष्ट्रातून पुणे, नाशिक, मुंबई, तर कर्नाटकातून बेळगाव, हुबळी ,धारवाड, बंगलोर व दिल्ली येथील दारुल देवबंद मदरसामधून घेतली जाणार आहे. रमजान ईदसाठी २० वर्षांपासून खिरीचे साहित्य, ड्रायफुटस, पुलावचे साहित्य, इमिटेशन ज्वेलरी, अत्तर, बांगड्या, मेंहदी, रुमाल, आदी वस्तू एकाच छताखाली स्वस्त दरात मिळाव्यात म्हणून बिंदू चौकात रंगराव साळोखे विद्यामंदिरच्या वाहनतळाच्या जागेवर आयोजित ईद फेस्टिव्हलचे उद्घाटन नुकतेच महापौर सुनीता राऊत यांच्या हस्ते झाले. संयोजन गणी आजरेकर, शौकत बागवान, शकील अत्तार, नगरसेवक आदिल फरास यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
चाँद कमिटीची आज होणार बैठक घोषणेची उत्सुकता
By admin | Updated: July 28, 2014 00:12 IST