कोल्हापूर : रंगकाम आटोपून घराकडे परत जाताना मधमाशी चावल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या कामगाराचा सोमवारी (दि. २७) मध्यरात्री सीपीआरमध्ये मृत्यू झाला. संतोष राजाराम कांबळे (वय ३५, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. मधमाशी चावल्याची घटना २१ मार्चला शिरोली एमआयडीसी येथे नागाव फाट्याजवळ घडली होती.सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कांबळे हे रंगकाम करण्यासाठी शिरोली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत जात होते. २१ मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास काम आटोपून घरी परत जाताना नागाव फाट्याजवळ त्यांना मधमाशीने डंख मारला. त्यानंतर ते उपचारासाठी स्वत: शिरोली येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी सोमवारी (दि. २७) त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र मध्यरात्रीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फक्त एक मधमाशी चावल्याने धडधाकट असलेल्या कांबळे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
Kolhapur News: मधमाशी चावल्याने रंगकाम कामगाराचा मृत्यू
By उद्धव गोडसे | Updated: March 28, 2023 19:13 IST