कोल्हापूर : उद्याची संक्रांत ग्रहमानानुसार चांगली नाही; त्यामुळे ज्यांना एकच मुलगा किंवा मुलगी आहे, त्यांनी हनुमान मंदिरात जाऊन, श्रीफळ देऊन देवाची पूजा करावी, असे कोणीतरी फोनवर घरोघरी कळविल्याने महिलांची झुंबड उडाली. कसबा बावड्यात नारळाऐवजी महिलांनी मुलाच्या काळजीने प्रत्येकी दहा चॉकलेट्स वाटली. कालपासून कुणीतरी हा मेसेज सोशल मीडियावर फिरविला. त्यामुळे महिला नारळ, तेल घेऊन हनुमान मंदिरात जात होत्या. बुबनाळ (ता. शिरोळ) येथील मंदिरात महिलांची गर्दी झाल्याची माहिती सजग वाचकाने ‘लोकमत’ला फोनवरून कळविली.मुळात मकर संक्रांत हा गोडवा घेऊन येणारा सण. कोणताही सण हा चांगलाच असतो. त्यात आणखी तो चांगला, हा वाईट अशी वर्गवारी असत नाही. तरीही लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन कुणीतरी मेसेज सोडला व महिला त्यास बळी पडल्या. त्यामुळे मंदिरातील पुजाऱ्यांची मात्र पोती भरून नारळांची मिळकत झाली. प्रत्येक कुटुंबात एकच मुलगा वा मुलगी असते. त्यामुळे मेसेजही चपखलपणे सगळ्यांनाच लागू होणारा होता. (प्रतिनिधी)
अंधश्रद्धेमुळे महिलांची हनुमान मंदिरात झुंबड
By admin | Updated: January 15, 2015 00:35 IST