कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने धाकधूक कमी होत असतानाच तपासणीला दिलेल्या स्त्रावचे अहवाल दोन दोन दिवस मिळत नसल्याने स्त्राव देणाऱ्यांचा जीव टांगणीला लागत आहे. रोजच्या तपासण्या २० हजारावर होत आहेत, पण अहवाल मात्र १८ हजारांच्या आतच होत असल्याने उर्वरितांना मात्र पॉझिटिव्ह की निगेटिव्ह या धास्तीतच दिवसरात्र काढावा लागत आहे. स्त्राव दिल्यानंतर अहवाल येईपर्यंत सक्तीचे क्वाॅरंटाईन असतानादेखील लोक बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याने संसर्गाची टांगती तलवार आहे.
जिल्ह्यात घरोघरी जाऊन रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. यात पॉझिटिव्ह येणाऱ्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाते. राेजच्या १८ हजाराच्यावर चाचण्या केल्या जात आहे. सरकारी प्रयोगशाळेसह खासगी दवाखान्यातही तपासणीची सोय उपलब्ध आहे. सरकारीच्या तुलनेत खासगीत स्वॅब तपासणीचा आकडा जास्त आहे. सरकारीमध्ये रोजचे आरटीपीसीआर रिपोर्ट ४ हजार २००, अँटिजेनची ३१०० तर खासगीमध्ये ११ हजार ३०० स्त्राव तपासले जातात. एवढीच क्षमता असताना अँटिजेनमुळे आणखी भार वाढला आहे. परिणामी तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
स्त्राव दिल्यानंतर आठ तासांच्या आत तरी अहवाल येणे अपेक्षित असते, पण तो मिळत नसल्याने स्त्राव देणाऱ्यांची मानसिकता ढळते. दोन-दोन दिवस वेगळे बसून काढणे अनेकांच्या जीवावर येते, त्यामुळे ते सहजरित्या इतरत्र फिरत राहतात. अहवाल आला आणि पॉझिटिव्ह आला की मग धावपळ सुरू होते, पण त्यांच्या संपर्कात आलेले पुन्हा स्त्राव देण्याच्या रांगेत,मग पुन्हा अहवालाची प्रतीक्षा असे चक्रच सुरू झाल्याचे दिसत आहे.
चौकट
आमदार आबिटकर यांची कारवाईची मागणी
स्त्राव दिल्यानंतर अहवाल २४ तासांच्या आत येणे अपेक्षित असताना त्याला ४ ते ६ दिवस लागत असल्याच्या मुद्याकडे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालकांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी उपसंचालकांना पत्र पाठवून स्त्रावचे अहवाल देण्यास विलंब लावणाऱ्या थायरोकेअर कंपनीवर व त्यांना सहकार्य करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी केली आहे.