वाळवा (जि. सांगली) : राजीव गांधी खेल अभियानांतर्गत येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर विभागीय मुला-मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यावर्षी अजिंक्यपद पटकाविले, तर पुणे विभागीय मुले व मुलींचा संघ उपविजेता ठरला.विजेत्या संघांना हुतात्मा उद्योग संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी, विटा नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. उपांत्य फेरीच्या मुलांच्या सामन्यात पुणे संघाने ६३ - १८ अशा गुणांनी अमरावतीचा पराभव केला, तर दुसऱ्या लढतीत कोल्हापूर विभागाने नागपूरचा ५९-३३ अशा गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली.मुलींच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुणे संघाने औरंगाबादचा ६७-२२, तर दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरने अमरावतीचा ४६-१२ गुणांनी पराभव केला.मुलांचा अंतिम सामना कोल्हापूर वि. पुणे असा झाला. यात कोल्हापूरने ४३-२६ गुणांनी पुणे संघावर दणदणीत विजय प्राप्त केला. कोल्हापूर संघातील शुभम पाटील, वीरधवल नायकवडी, शुभम माने यांनी अष्टपैलू कामगिरी केली. वीरधवलने उत्कृष्ट चढाई करीत १३ गडी बाद केले. त्याचा ‘अष्टपैलू खेळाडू’ म्हणून गौरव करण्यात आला.मुलींच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने पुण्याचा ६३-२५ अशा गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले. कोल्हापूरची सोनाली हेळवी हिची ‘अष्टपैलू खेळाडू’ म्हणून निवड करण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुलांच्या गटात नागपूरने अमरावतीचा ४३-३७, तर मुलींच्या गटात अमरावतीने औरंगाबादचा २३-२२ गुणांनी पराभव केला. (वार्ताहर)अष्टपैलू खेळाडू वीरधवल नायकवडी (कोल्हापूर)सोनाली हेळवी (कोल्हापूर) वाळवा येथे राजीव गांधी खेल अभियानांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेत्या कोल्हापूर संघाला ‘हुतात्मा’ साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या हस्ते ट्रॉफी व पदक देण्यात आले.
कोल्हापूरला दुहेरी मुकुट
By admin | Updated: December 29, 2014 00:05 IST