उत्तूर : स्विफ्ट डिझायरमधून मुंबईहून भाडेकरु घेऊन गोव्याकडे जात असताना अरुण लालुनाईक राठोड (वय २९, रा. पितामह रामजीनगर शाळा नं. २ घाटकोपर (वेस्ट) मुंबई ) या चालकाला गाडीतील दोघा तरुणांनी मुमेवाडी (ता. आजरा) येथील वळणावर मारहाण केली. त्यांनी राठोड यांचे ७६०० रुपये, मोबाईल आणि स्विफ्ट डिझायर घेऊन पोबारा केला. राठोड यांनी आजरा पोलिसांत वर्दी दिली आहे. भाडेकरु तरुणांनी ही गाडी मुंबईच्या कंपनीसाठी मीरा भार्इंदर येथून सांताक्रुझला जाण्यासाठी भाड्याने घेतली होती. मात्र सांताकु्रझमध्ये आल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेने जायचे असे चालकाला सांगितले होते. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, स्विफ्ट डिझायर सिद्धार्थ नृसिंह मूर्ती यांच्या मालकीची आहे. शुक्रवारी २१ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास दोन अज्ञात गुजराथी तरुणांनी मीरा रोड भार्इंदर ते डेमोस्टीक एअर पोर्ट सांताक्रुझ (ईस्ट) असे भाडे ठरवून ओला कंपनीकडून टुरिस्टची गाडी मागवून घेतली. राठोड हे गाडी घेऊन गेले. सांताकु्रझमध्ये आल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेने जायचे असे त्यांनी चालकाला सांगितले. हे दोन्ही तरुण रात्रभर मद्यधुंद अवस्थेत होते. शनिवारी २२ रोजी दुपारी ते निपाणी येथे आणली. तेथे एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन व जेवण केले. तेथे गोव्याला कामानिमित्त जायचे आहे, अशी दमदाटी करून राठोड यांना गोव्याच्या दिशेने गाडी चालवण्यास सांगितले. मुमेवाडीनजीक वळणावर गाडी थांबवण्यास सांगितले. तेथे तरुण शेतवडीत जाऊन दारू पीत असताना चालकाला बोलावून घेतले. त्याला स्प्राईटमधून गुंगीचे औषध पाजले व हातपाय बांधून काठीने मारहाण केली. राठोड यांचे ७६०० रुपये, मोबाईल, गाडीचे लायसन्स काढून घेतले व त्याला तेथेच सोडून कारसह पलायन केले. दरम्यान, चालक राठोड स्वत: सुटका करून रस्त्यावर आले. उपसरपंच दत्तात्रय मिसाळ शेतात काम करीत होते. त्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर राठोड यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर आजरा पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत आजरा पोलिसांनी मीरा-भार्इंदर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नोंद वर्ग केला आहे. ५ लाख १३ हजार ६१० रुपयांचा माल लंपास झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबईच्या चालकाला आजऱ्याजवळ लुटले
By admin | Updated: August 24, 2015 00:36 IST