कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे उद्या (बुधवारी) सकाळी दहा वाजता ऐतिहासिक बिंदू चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आमदार सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे. यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डाॅ. शरद गायकवाड व मार्गदर्शक प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली.
यानिमित्त दुपारी कुष्ठधाम येथील गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर रुपाताई वायदंडे यांचे आण्णाभाऊ साठे व डाॅ. बाबासाहेब यांच्यावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी पाच वाजता समितीचे अध्यक्ष डाॅ. शरद गायकवाड यांचे फुले, आंबेडकरी विचारधारा आणि आण्णाभाऊ साठे यांच्यावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ‘आधुनिक भारताचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप प्रा. शहाजी कांबळे करणार आहेत. सर्व कार्यक्रम कोरोनासंबंधी नियम पाळून केले जाणार आहेत. या कार्यक्रमांकरिता रुपाताई वायदंडे, उत्तम कांबळे, प्रा. विश्वासराव देशमुख, डी. जी. भास्कर, सदानंद डिगे, संजय जिरगे, नंदकुमार गोंधळी, जयसिंग जाधव, आदी परिश्रम घेत आहेत.