गडहिंग्लज : गडहिंग्लजचे माजी आमदार आणि विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार यंदा ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्था कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.घाळी म्हणाले, डॉ. घाळी यांनी योगदान दिलेल्या क्षेत्रामधील राज्यातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. घाळींच्या स्मृतिदिनी (दि. २४ आॅगस्ट) दुपारी ३ वाजता ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल.यापूर्वी डॉ. राजन गवसे, प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, अनंतराव आजगावकर, पेठवडगावचे नगराध्यक्ष विजयसिंह यादव, डॉ. भीमराव गस्ती, आदींना या पुरस्कराने सन्मानित केले आहे. २२ आॅगस्टला सकाळी डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व व रत्नमाला घाळी काव्य वाचन स्पर्धेचे उद्घाटन आणि डॉ. घाळी सांस्कृतिक भवनचे उद्घाटन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होईल. यावेळी विवीध कार्यक्रम होणार आहेत.
नरेंद्र दाभोळकर यांना डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार
By admin | Updated: August 15, 2014 00:23 IST